Login

"काय माझा गुन्हा...? भाग १७

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग १७



आरवने गौरवीकडे सौम्य नजरेने पाहिले आणि हळूच म्हणाला,
“तुझी जर इच्छा असेल तर तू मला तुझं दुःख, तुझा त्रास, तुझ्या वेदना... एक मित्र म्हणून सांगशील का…? तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर तु बिनधास्त मला सांगु शकतेस...
आरव शांतपणे म्हणतो...

पण गौरवी मात्र मान खाली घालून असते तेव्हा आरव पटकन बोलतो...
“तुझ्यावर कसलीही जबरदस्ती नाही आहे... तुला सांगायची इच्छा झाली तर तु बिनदिक्कत सांग, आणि तसंही नाही सांगितलंस तरीही काही हरकत नाही…” असं म्हणत आरव खोटं खोटं हसू लागतो...

गौरवी क्षणभर गप्प राहते...
जणू आयुष्यभर मनात साठवलेले शब्द
आज पहिल्यांदाच बाहेर यायची वाट पाहत असतात...

“मी गौरवी…” ती हळू आवाजात बोलते...

“माझ्या सासरचं आडनाव परब… आणि माहेरचं आडनाव गायकवाड…”

ती क्षणभर थांबते...
“मला वाटतं… यावरून तुला समजलंच असेल
मी कोणत्या जातीची आहे ते…”

ती नजर खाली घालते... जणू स्वतःच्याच ओळखीची लाज वाटावी, असा समाजाने शिकवलेला धडा जो तीला पावलोपावली मिळाला होता...

आरव लगेच मध्येच तिचं वाक्य तोडतो.
त्याचा आवाज शांत असतो, पण शब्द धारदार शस्त्रासारखे असतात...
“आडनावावरून जात ठरवणारे माणसांना माणूस म्हणून पाहू शकत नाहीत गौरवी...  तर ते आडनावावरून जात ठरवणारे फक्त मूर्ख असतात... तु गौरवी आहेस..."
तो थोडा पुढे झुकतो, पण अजूनही अंतर राखून पुढे बोलतो...

“आणि जे लोक
जातीवरून माणसाचं मोल ठरवतात, ते खरे तर स्वतःच्या मानसिकतेचं अपयश लपवत असतात...”

तो ठामपणे पुढे म्हणतो..
“तुझं आडनाव मला तुझी किंमत सांगत नाही... तर तुझं दुःख सांगतं, तुझा संघर्ष सांगतं, आणि हा समाज किती अन्यायी आहे ते सांगतं...”
क्षणभर शांतता पसरते...

“आणि एक गोष्ट लक्षात ठेव तु तुझी ओळख लपवायची नाहीस या पुढे... आता लपवायची वेळ आलीय ती या समाजाने स्वतःची...”
"कारण तु एक माणूस आहेस, एक स्त्री जी संघर्ष करतेय... तुझी जात मला काही सांगत नाही, मला तुझी कहाणी सांगते..."

गौरवी आरवकडे पाहते...,  डोळ्यांत तीच्या अजूनही वेदना आहेत,
पण पहिल्यांदाच त्यात भीती नाही... तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलकासा आभास उमटला...
आभारी आणि विश्वासाचा...

ती हळूच बोलली,
"तुझ्यासारखी माणसं या जगात आहेत... म्हणून तरी माणुसकी अजून शिल्लक आहे..." ती क्षणभर थांबते... तिचा आवाज हलका कंप पावतो...
जणू आयुष्यभराचा थकवा त्या एका वाक्यात उतरतो...
“नाहीतर मी केव्हाच स्वतःला हरवून बसले असते…”

आरव तिच्या बोलण्याने थोडा भावूक झाला नाही, फक्त हसला आणि म्हणाला, "तू हरवलीस नाहीस गौरवी... तु जिवंत आहेस, आणि आता तुझ्या आयुष्यात आपण नवं पान उलटूया...
मी तुझ्यासोबत आहे..."

आरवचे बोलणं ऐकून गौरवीचे डोळे भरून आले... आणि तिच्या तोंडून शब्द फुटले...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all